मोठी बातमी : उत्तर चाकण पोलिसांची अवैध हातभट्टीवर मोठी कारवाई; १६ लाख रुपयांचे रसायन जप्त..
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण: चाकण उत्तर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी धाडसी छापे टाकून अवैध हातभट्टी दारू तयार करण्याचे तब्बल १६,००० लिटर गुळमिश्रित रसायन आणि साहित्य जप्त केले आहे. या दोन्ही कारवायांमध्ये मिळून ८ लाख रुपयांचा मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला असून, तीन जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कारवाईतील पोलीस पथक..
या दोन्ही कारवाया चाकण उत्तर पोलीस स्टेशनचे वरिष्ट पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पथकाने केल्या:
स.पो.नि. दगडे, पो.उप-निरीक्षक मोरखंडे, पो.हवा. योगेश कोळेकर,प्रितम ढमढेरे,पो.शि. सुमित जगझाप, महेश कोळी, शिवा लोखंडे, पो.शि. संदिप जोशी
पहिली कारवाई: काळूस गाव (भीमा नदीकाठ)
पहिली कारवाई काळूस गावच्या हद्दीतील संगमवाडी येथे भीमा नदीच्या काठावर करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, शेतकरी शिवाजी वाघमारे यांच्या शेतात दोन लोखंडी ड्रम आणि खड्ड्यांमध्ये हातभट्टी दारू तयार करण्यासाठी गुळमिश्रित रसायन भिजत घातले होते.
पोलीस पथकाने छापा टाकला असता, मुख्य आरोपी अनिल दिगंबर सीतापुरे (वय ३२, रा. पत्रा चाळ, चिखली) हा पोलिसांची चाहूल लागताच झाडाझुडपाचा फायदा घेऊन पसार झाला. या ठिकाणी पोलिसांनी ८,००० लिटर रसायन (किंमत ४ लाख रुपये) जप्त करून ते जेसीबीच्या साहाय्याने जागीच नष्ट केले. या प्रकरणी अनिल सीतापुरे आणि शिवाजी वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी कारवाई: भोसे गाव (सुकला डोंगर पायथा)
दुसरी कारवाई भोसे गावच्या हद्दीतील सुकला डोंगराच्या पायथ्याला असलेल्या पाझर तलावाजवळ करण्यात आली. येथे झाडाझुडपात अवैध हातभट्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
पोलिसांनी छापा टाकला असता, सावित्रीबाई बिरबल राठोड (वय ५६, रा. भोसे, ता. खेड) ही महिला आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाली. या ठिकाणाहून पोलिसांनी दोन लोखंडी ड्रममध्ये भिजत घातलेले ८,००० लिटर रसायन (किंमत ४ लाख रुपये) जप्त केले.

कायदेशीर कारवाई:
पळून गेलेल्या दोन्ही ठिकाणच्या आरोपींचा शोध पोलीस घेत असून, त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (फ) नुसार कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी दोन्ही ठिकाणचे नमुने (सॅम्पल) सील केले असून उर्वरित रसायन पंचसमक्ष नष्ट केले आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0