क्राईम : उत्तर चाकण पोलिसांची मोठी कारवाई; देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह एकाला अटक..!
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली असून, चाकण उत्तर पोलीस स्टेशनच्या पथकाने एका तरुणाला बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि १ हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, चाकण उत्तर पोलीस स्टेशनचे पथक परिसरात पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार प्रीतम ढमढेरे यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून विश्वासार्ह माहिती मिळाली. चक्रेश्वर रोड, सह्याद्री कॉलेजसमोर एका नाल्याजवळ एक इसम संशयास्पदरित्या थांबला असून त्याच्याकडे घातक शस्त्र असल्याची माहिती मिळाली होती.
मिळालेल्या माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी सापळा रचला. बातमीतील वर्णनानुसार एक तरुण तिथे येताना दिसला. संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली. यावेळी त्याच्या कमरेला खोचलेले एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्तूल (मॅगझीनसह) आणि खिशात एक जिवंत काडतूस आढळून आले.
आरोपीची ओळख..
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव गौरव मच्छिंद्र डोगरे (वय २९ वर्षे) असे असून तो मूळचा चाकण (रा. मनोज गवळी यांची रूम, विघ्नेश पार्क, ता. खेड, जि. पुणे) येथील रहिवासी आहे.
पोलीस कारवाई आणि पथक..
सदर कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली चाकण उत्तर पोलीस स्टेशनच्या पथकाने केली. यामध्ये पोलीस शिपाई सुमीत गौतम जगताप, पोलीस हवालदार प्रीतम ढमढेरे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे व त्यांच्या सहकाऱ्यांचा समावेश होता.
आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याने हे शस्त्र कोठून आणले आणि त्याचा काय उद्देश होता, याचा पुढील तपास उत्तर चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.
What's Your Reaction?
Like
4
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
1
Sad
0
Wow
0