God Bless || निसर्गाचा नजराणा अन् पांडवकालीन वारसा! सह्याद्रीच्या कुशीतील ‘गडदूदेवी’ देवस्थानात नवरात्राचा जागर; भाविकांची मांदियाळी..!
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
वाडा (ता. खेड) : सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगररांगांमध्ये आणि प्राचीन लेण्यांच्या सान्निध्यात वसलेले श्री क्षेत्र गडदूदेवी देवस्थान सध्या नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांच्या श्रद्धेचे आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र बनले आहे. जागृत देवस्थान म्हणून ख्याती असलेल्या या पुरातन मंदिरात देवीच्या दर्शनासोबतच सह्याद्रीच्या निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी राज्यभरातून हजारो भाविक व निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत.
पांडवकालीन लेण्यांमधील पुरातन स्थापत्य...
वाडा गावाच्या उत्तरेस सुमारे पाच किलोमीटर अंतरावर, निसर्गरम्य डोंगराच्या कपारीत श्री क्षेत्र गडदूदेवीचे मंदिर वसलेले आहे. हे मंदिर पांडवकालीन असल्याचा इतिहास सांगितला जातो. लेण्यांमधील मंदिराची ही रचना प्राचीन स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना मानली जाते. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे ठिकाण केवळ धार्मिक दृष्ट्याच नव्हे, तर ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा म्हणूनही अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे.
स्वयंभू तांदळे आणि शंकराची पिंड—एक दुर्मीळ संगम..
या मंदिराचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे गर्भगृहात विराजमान असलेल्या गडदूबाई आणि कळमजाई यांच्या तांदळा स्वरूपातील स्वयंभू मूर्ती. विशेष म्हणजे, या दोन्ही देवींच्या मूर्तींच्या मध्यभागी भगवान शंकराची पिंड स्थापित आहे. मंदिराच्या दर्शनी भागात शंकर-पार्वतीचे वाहन नंदी आणि देवीचे वाहन वाघ यांच्या दगडी भव्य मूर्ती कोरलेल्या आहेत. तसेच मंदिरासमोर देवीचे सेवक म्हसोबा यांचेही स्थान आहे.

धार्मिक पर्यटनासोबत निसर्गपर्यटनाला गती...
वाडा परिसर भीमा, भामा आणि आरळा या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेला असल्याने या भूमीला विशेष महत्त्व आहे. खेडहून वाडामार्गे तसेच घोडेगाव येथूनही या देवस्थानाकडे सहज पोहोचता येते. हिरवेगार डोंगर, धुक्याची चादर आणि प्राचीन लेण्यांचे वैभव यामुळे या नवरात्रोत्सवात येथे धार्मिक पर्यटनासोबतच निसर्गपर्यटनालाही मोठी चालना मिळत आहे.
भाविकांच्या सोयीसाठी भव्य आरसीसी सभामंडप...
या देवस्थानची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन शासनाकडून या मंदिराला ‘क’ वर्गाचा पर्यटन दर्जा प्राप्त झाला आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून देवस्थानच्या वतीने मंदिरालगतच एका भव्य आर.सी.सी. सभामंडपाची उभारणी करण्यात आली आहे, अशी माहिती देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष काळूराम सुपे यांनी दिली.
उत्सवात विविध मान्यवरांची उपस्थिती..
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित धार्मिक कार्यक्रमांना विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी भेट दिली. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य समीर सुपे, पंचायत समिती सदस्या मनीषा हिले, कविता गणेश बोत्रे, सोनल विनोद टोपे, सरपंच रुपाली मोरे, सुरेखा सुपे, पल्लवी सुपे, विद्या जगदाळे, शितल हुंडारे, सुनंदा सुपे, कल्याणी कहाणे, शुभदा क्षीरसागर, संस्थापक अध्यक्ष काळूराम सुपे, जाकीर तांबोळी, किशोर सुपे, अशोक सुपे, रामदास घनवट, नवनाथ सुरकुले, ज्ञानदेव सुपे, दिलीप सुपे यांच्यासह ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0